शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी येथील राजकीय घडामोडींना मोठे वळण देणारी घटना आज घडली. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे व दिप्ती कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे तसेच माजी नगरसेवक राजेंद्र जगताप हे प्रमुख उपस्थित होते.
या प्रवेशामुळे नवी सांगवी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली असून स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. अंबरनाथ कांबळे व दिप्ती कांबळे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील विविध विकासकामांसाठी योगदान दिले असून, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत आगामी काळात संघटन वाढीसाठी आणि स्थानिक विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.



