शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधून माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी सुरू केलेल्या जन-आशीर्वाद दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि विश्वासपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. गल्लोगल्ली, वस्ती-वस्ती फिरत बोराटे थेट नागरिकांशी संवाद साधत असून, त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडत आहेत.
या दौऱ्याच्या निमित्ताने केवळ प्रचार नव्हे, तर नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, स्थापत्य कामे, सार्वजनिक उत्सवांतील सहकार्य अशा विविध विषयांवर बोराटे नागरिकांशी सखोल संवाद साधत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या कार्यावर समाधान व्यक्त करत उघडपणे आशीर्वाद दिले, तर तरुणांनीही विकासाची दिशा स्पष्ट करणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला.
गेल्या नऊ वर्षांत सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, महापालिकेशी संबंधित विकासकामे, सार्वजनिक मदतकार्य सातत्याने राबवून बोराटे यांनी जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. कोरोना महामारीचा कठीण काळ असो वा प्रशासकीय काळातील मर्यादा—तरीही समाजहित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी कार्य सुरूच ठेवले.
“प्रशासकीय काळात अपेक्षित वेगाने विकास होऊ शकला नाही; मात्र आता नागरिकांनी संधी दिल्यास प्रभागातील अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे ठाम आश्वासन बोराटे यांनी दिले. जनतेशी थेट नातं, कामाचा ठोस अनुभव आणि विकासाची स्पष्ट दिशा—यामुळे येत्या निवडणुकीत वसंत बोराटे यांना पुन्हा सभागृहात पाठवण्याचा कौल मतदार देणार, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.


