शबनम न्यूज | प्रतिनिधी
मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या समवेत काही दिवसांपूर्वी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरातील १८ मीटर मिलिटरी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. हा रस्ता सुमारे ८० टक्के पूर्ण झाला असला तरी काही ठिकाणी काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याचे उर्वरित काम रखडले होते. या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या कुणाल आयकॉन, एस-३ लाईफस्टाईल, शुभश्री वुड्स, रोझवुड, रिदम, प्राईम प्लस, रोझ व्हॅली, पीस व्हॅली, समृद्धी पार्क, रोझ काऊंटी, अल्कोव, साई पर्ल आदी सोसायट्यांमधील नागरिकांना धूळ, खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका सहन करावा लागत होता.

ही गंभीर बाब नाना काटे यांनी थेट अजितदादांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी जागेवरच अजित पवार यांनी महापालिका आयुक्त श्रवण हार्डिकर यांना तातडीने हस्तक्षेप करून रस्त्याच्या समस्या दूर करत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
त्या आदेशानुसार आज १८ मीटर मिलिटरी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजितदादा पवार आणि नाना काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल सोसायटीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे स्वागत व आभार मानले आहेत.
लवकरच हे काम पूर्ण झाल्यास पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कायमस्वरूपी दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


