पी.के. चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी पुढाकार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देत असताना नागरिकांनी पी.के. चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दैनंदिन अडचणींबाबत तक्रारी मांडल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत संदीप विठ्ठल काटे यांनी कोणताही विलंब न करता प्रत्यक्ष पी.के. चौक येथे भेट दिली.
यावेळी आर.टी.ओ. प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करत वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी, वाहनांची वाढती संख्या, सिग्नल व्यवस्थापन व अडथळ्यांबाबत आढावा घेण्यात आला. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून अपघातांचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत, लवकरात लवकर प्रभावी आणि शाश्वत उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली.

याप्रसंगी अनिता ताई संदीप काटे यांनीही नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. “नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून घेऊन आश्वासन देणे नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून मार्ग काढणे हीच आमची भूमिका आहे,” असे मत संदीप काटे यांनी व्यक्त केले.
नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद देत प्रशासनाशी थेट समन्वय साधणारा हा पुढाकार पिंपळे सौदागरवासीयांसाठी दिलासादायक ठरत असून, येत्या काळात पी.के. चौकातील वाहतूक समस्येवर ठोस तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


