अनिता ताई संदीप काटे व संदीप काटे यांच्या वतीने उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदासाठी, आरोग्यदायी विरंगुळा मिळावा आणि त्यांना पारंपरिक हुरड्याचा मनसोक्त अनुभव घेता यावा या उद्देशाने अनिता ताई संदीप काटे व संदीप विठ्ठल काटे यांच्या माध्यमातून पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास हुरडा पार्टी व एकदिवसीय सहल आयोजित करण्यात आली होती.
या सहलीत तळेगाव ढमढेरे, तुळापूर आणि आळंदी या ठिकाणांचा समावेश करण्यात आला होता. निसर्गरम्य वातावरणात, शेतात ताज्या ज्वारीच्या हुरड्याचा आस्वाद घेताना ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

हसत-खेळत गप्पा, जुने अनुभव आठवत मैत्रीपूर्ण संवाद, सामूहिक खेळ, संगीत व हलका व्यायाम अशा विविध उपक्रमांमुळे संपूर्ण दिवस उत्साहात गेला. सहलीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. सुरक्षित वाहतूक, स्वच्छ भोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्राथमिक आरोग्य सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन तणावातून मुक्ती मिळाली, मानसिक आनंद व सामाजिक एकोपा वाढीस लागला. “अशा उपक्रमांमुळे आम्हाला पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटते,” अशी भावना अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
समाजातील ज्येष्ठ घटकासाठी सातत्याने उपक्रम राबविण्याचा आपला संकल्प असल्याचे सांगत, अनिता संदीप काटे व संदीप विठ्ठल काटे यांनी भविष्यातही आरोग्य, पर्यटन व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी असेच उपक्रम आयोजित करण्यात येतील, असे आश्वासन दिले.



