शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘काव्यानंद हा ब्रह्मानंदासारखा असतो!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी व्यक्त केले. कवी नितीन कुलकर्णी उर्फ सुमतीसुत लिखित आणि पीच ब्लिंक प्रकाशननिर्मित ‘सूर्यपक्षी – एक प्रकाशवारी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डाॅ. वंदना घांगुर्डे, ज्येष्ठ रंगकर्मी राजेंद्र करंबेळकर, ज्येष्ठ कवयित्री सुमती कुलकर्णी, प्रकाशिका निकिता कपूर – मथाडू आणि कवी नितीन कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
राजन लाखे पुढे म्हणाले की, ‘काव्य हा साहित्याचा आत्मा आहे. त्यामुळे एखाद्या बृहद कादंबरीचा सारांश कवी मोजक्याच ओळीतून व्यक्त करू शकतो; आणि हेच कवी अन् कवितेचे सामर्थ्य असते. ‘सूर्यपक्षी’ या काव्यसंग्रहातील विषयवैविध्यातून हे सामर्थ्य प्रतीत होते!’ डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी, ‘संगीत, कला, साहित्य यामुळे मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो. औद्योगिक वातावरणात राहूनही नितीन कुलकर्णी यांनी काव्यगुण जोपासले!’ असे गौरवोद्गार काढले. डॉ. वंदना घांगुर्डे यांनी, ‘माझ्या कलाजीवनाला प्रेरणा देणाऱ्या काही गोष्टी ‘सूर्यपक्षी’ या काव्यसंग्रहात आहेत!’ असे मत व्यक्त केले. राजेंद्र करंबेळकर यांनी नितीन कुलकर्णी यांच्याशी पंचवीस वर्षांपासून असलेल्या ऋणानुबंधाला उजाळा दिला. सुमती कुलकर्णी यांनी आशीर्वादपर शुभेच्छा व्यक्त केल्या. दीपक कुलकर्णी यांनी नितीन कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वातील कलात्मक अन् संशोधनात्मक पैलूंची माहिती दिली. निकिता कपूर यांनी, ‘व्यवसायाने अभियंता असूनही नितीन कुलकर्णी यांनी आपल्या आईकडून मिळालेला काव्याचा वारसा जोपासला!’ अशी माहिती दिली. अथर्व कुलकर्णी यांनी ‘सूर्यपक्षी’ या काव्यसंग्रहातील ‘खाद्ययात्रा’ या कवितेचे अभिवाचन केले. कवी नितीन कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून, ‘कोरोना काळात एक दिवस एका चिमुकल्या सूर्यपक्ष्याचे अवचित घडलेले दर्शन माझ्यासाठी टर्निंग पाँईट ठरला. त्यातून कवितालेखनाची स्फूर्ती मिळाली!’ अशा शब्दांत आपली काव्यलेखन प्रक्रिया उलगडली.
दीपप्रज्वलन, गणपतीपूजन आणि ‘सूर्यपक्षी – एक प्रकाशवारी’ या काव्यसंग्रहाच्या प्रतिमेचे अनावरण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. डॉ. उमा भारतीय यांनी सूत्रसंचालन केले. सुचेता कुलकर्णी यांनी आभार मानले.


