spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रभाग क्र. ३१ मध्ये जोरदार प्रचार शुभारंभ; प्रभागात उत्स्फूर्त स्वागत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ३१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार आज जोरदार शक्तीप्रदर्शनात सुरू झाला. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अरुण पवार, उमा शिवाजी पाडुळे आणि जया बाळासाहेब सोनवणे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारप्रमुख नाना काटे, माजी नगरसेवक कैलास बारणे यांनी प्रचारात सहभागी होत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

नवी सांगवीतील एम. एस. काटे चौक ते कृष्णा चौक, साई चौक, फेमस चौक, शिवनेरी चौक, एम. के. चौक, स्वामी विवेकानंद नगर, समता नगर असा भव्य प्रचार रॅलीचा मार्ग होता. या रॅलीत शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. उमेदवारांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, साई मंदिर, महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, भवानी माता मंदिर, शनी मंदिर आदी ठिकाणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

‘अजित पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक ३१ मधील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उमेदवार माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले,
“नवी सांगवीतील मतदार यावेळी परिवर्तन घडवणार असून, विकासाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम पाठिंबा देतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. नवी सांगवी आणि परिसरातील नागरिकांनी मला यापूर्वीही भरभरून प्रेम दिले आहे. या भागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, उद्याने, शाळा, आरोग्य सुविधा आदी मूलभूत प्रश्नांवर आम्ही सातत्याने काम केले आहे. यावेळी ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर विकास विरुद्ध दुर्लक्ष अशी आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील मतदार निश्चितच परिवर्तन घडवतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.

अरुण पवार (उमेदवार):
“प्रभागातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही प्रामाणिकपणे लढणार आहोत. बेरोजगारी, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षितता हे आमचे प्राधान्यक्रम असतील. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. जनतेचा उत्साह पाहता, विजय निश्चित असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.”

उमा शिवाजी पाडुळे (उमेदवार):
“महिला सक्षमीकरण, स्वच्छ व सुरक्षित परिसर, अंगणवाडी, शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या सुविधा बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. महिलांचा वाढता सहभाग ही परिवर्तनाची नांदी आहे.”

जया बाळासाहेब सोनवणे (उमेदवार):
“सामान्य नागरिकांचे प्रश्न महापालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी मी सदैव उपलब्ध राहीन. पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती आणि आरोग्य सेवा यावर विशेष लक्ष दिले जाईल. प्रभागातील सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा निर्धार आहे.”

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!