शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड उपशहर प्रमुख निखिल दळवी यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे शहरातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते सचिन आहेर आणि माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवा सेना कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
दिनदर्शिकेमध्ये शिवसेनेच्या विचारधारेसह सामाजिक बांधिलकी, शहरातील विकासकामे, स्थानिक प्रश्नांवर केलेल्या आंदोलनांची माहिती, तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविण्यात आले आहे. ही दिनदर्शिका केवळ तारखांचा संग्रह नसून शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार आदित्य ठाकरे यांनी निखिल दळवी यांच्या कार्याचे कौतुक करत, “पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी शिवसेना हीच खरी शिवसेना आहे,” असे स्पष्ट केले.
निखिल दळवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ही दिनदर्शिका म्हणजे कार्यकर्त्यांच्या कष्टांचा सन्मान असून, आगामी काळात शहरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


