spot_img
spot_img
spot_img

बंडखोरीचा दणदणीत पराभव; भाजप माजी नगरसेवकाचे डिपॉझिट जप्त

आमदार शेळके न फिरकताच भावाचा विक्रमी विजय, शेळके कुटुंबाची राजकीय पकड पुन्हा सिद्ध

शबनम न्यूज | प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक आठ (जागा ब) हा मतदारसंघ केवळ निवडणूक नाही, तर थेट राजकीय ताकदीची चाचणी ठरला. आमदार सुनील शेळके यांच्या भावाविरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवक अमोल जगन्नाथ शेटे यांचा मतदारांनी अक्षरशः धुव्वा उडवत डिपॉझिट जप्त केल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तसेच आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शंकरराव शेळके यांनी तब्बल २,५०१ मतांच्या प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत या लढतीवर शिक्कामोर्तब केले. हा विजय केवळ आकड्यांचा नव्हे, तर बंडखोरी, विरोध आणि प्रतिष्ठेच्या राजकारणावर दिलेला थेट राजकीय चपराक ठरला आहे.

आमदार फिरकलेही नाहीत; तरीही विजय प्रचंड!

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रचारात आमदार सुनील शेळके हे या प्रभागात एकदाही प्रचारासाठी फिरकले नाहीत. तरीदेखील सुदाम शेळके यांनी मिळवलेला हा विक्रमी विजय म्हणजे शेळके कुटुंबाचा जनाधार, संघटनात्मक ताकद आणि तळेगाववरील राजकीय प्रभाव किती खोलवर रुजलेला आहे, याचे ठळक उदाहरण ठरले आहे.

बंडखोरीला मतदारांचा नकार

भाजपचे माजी नगरसेवक अमोल जगन्नाथ शेटे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आमदार शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने बंडखोरीला मतदारांनी साफ नकार दिला. शेटे यांना केवळ २७३ मते मिळाली, तर नोटाला ४४ मते पडली. एकूण ३,०९१ वैध मतांपैकी बहुसंख्य मते एकहाती खेचत सुदाम शेळके यांनी विरोधकांची राजकीय हवा काढून घेतली.

शेळके कुटुंबाचे वर्चस्व अधोरेखित

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत २८ पैकी १९ जागा बिनविरोध निवडून आल्याने अनेक ठिकाणी निवडणूक झालीच नाही. मात्र आमदारांच्या भावाला प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागल्याने या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. निकालानंतर मात्र सर्व चर्चा थांबल्या आणि शेळके कुटुंबाचे तळेगावातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित झाले.

या दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तळेगावच्या राजकारणात “शेळके ब्रँड” अजूनही अबाधित आणि निर्णायक आहे, हे या निकालाने निर्विवादपणे स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!