शबनम न्यूज
पिंपरी, – महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि कोणत्याही प्रकारच्या त्रुटीशिवाय पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ईव्हीएमची हाताळणी, मॉक पोलची कार्यपद्धती, मतदान साहित्याचे व्यवस्थापन, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच मतदानानंतरची कार्यवाही या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती असणे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय निवडणूक प्रशिक्षण चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तीन सत्रांमध्ये पार पडले. या प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे बोलत होते.
या प्रशिक्षणास सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह मुख्य प्रशिक्षक नरेंद्र बंड, रामेश्वर पवार, शिवाजी लाटे, संजीव आनंदकर, किशोर शिंदे, अमोल शिंदे, गणेश सुर्वे तसेच मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी हे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा कणा असतात. त्यांच्या दक्षतेवर, समन्वयावर आणि निर्णयक्षमतेवर संपूर्ण मतदान प्रक्रियेची विश्वासार्हता अवलंबून असते. त्यामुळे प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहून प्रत्येकाने आपली भूमिका, जबाबदारी आणि अधिकार स्पष्टपणे समजून घ्यावेत, जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणताही संभ्रम किंवा अडथळा निर्माण होणार नाही.
प्रशिक्षणात संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण मतदान प्रक्रियेचे सखोल व टप्पानिहाय तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) ओळख करून देण्यात येऊन बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची अचूक हाताळणी, परस्पर जोडणी तसेच त्यांची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली. मतदान सुरू करण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या मॉक पोलची संपूर्ण प्रक्रिया, त्याची नोंदणी, तसेच मॉक पोलनंतर यंत्रे सील करण्याची कार्यवाही सविस्तरपणे समजावून सांगण्यात आली.
निवडणूक विषयक कायदेशीर तरतुदी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणूक प्रक्रियेत करण्यात आलेले महत्त्वाचे बदल, टपाली मतदानाची अंमलबजावणी व त्यासंदर्भातील जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे, मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणारे निवडणूक साहित्य ताब्यात घेणे, त्याची तपासणी करणे, साहित्य वितरण व स्वीकृतीची कार्यपद्धती, चिन्हांकित मतदार यादी तपासणी तसेच मतदान यंत्रांची पूर्वतपासणी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
याशिवाय मतदान केंद्र व मतदान कक्षांची उभारणी, मतदानाच्या आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यानंतर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदानादरम्यान नियमांचे पालन तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करावयाची अंतिम कार्यवाही याबाबत मुख्य प्रशिक्षक नरेंद्र बंड, रामेश्वर पवार, शिवाजी लाटे, संजीव आनंदकर, किशोर शिंदे, अमोल शिंदे, गणेश सुर्वे यांनी प्रत्यक्ष उदाहरणे आणि प्रात्याक्षिकांच्या आधारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.


