शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीस आता काहीच दिवस शिल्लक राहिले असून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. तर २ तारखेनंतर अधिकृत प्रचाराला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ हे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढविणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेली अनेक वर्षे प्रभागात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा अशा मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या समस्या जैसे-थेच राहिल्याने आता परिवर्तन आवश्यक असल्याचे मत मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे यावेळी विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारालाच संधी देण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशांत सपकाळ यांना लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
प्रशांत सपकाळ हे प्रभागातील पायाभूत सुविधा बळकट करणे, युवकांसाठी संधी निर्माण करणे, महिलांसाठी सोयीसुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि नागरी प्रश्नांचे वेळेत निराकरण या मुद्द्यांवर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. विशेष म्हणजे युवकांची मोठी आणि सक्रिय फळी त्यांच्या पाठीशी उभी असून युवकांचा वाढता पाठिंबा ही त्यांची मोठी ताकद ठरत आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक २३ मध्ये विकास आणि परिवर्तनाचा मुद्दा केंद्रस्थानी असून, या निवडणुकीत प्रशांत सपकाळ यांची उमेदवारी प्रभागाच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


