भोसरीत आज ओबीसी आरक्षणासाठी रणशिंग फुंकणार; भव्य मेळाव्याचे आयोजन
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज भोसरीत मोठा एल्गार!
संघर्ष समिती व सामाजिक संघटनांचा आक्रमक मेळावा
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
भोसरी : ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मोठा आवाज उठवण्यासाठी आज भोसरी येथे भव्य ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी संघर्ष समिती, दिशा फाउंडेशन तसेच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा पार पडणार असून, यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या सद्यस्थितीवर सखोल चर्चा केली जाणार आहे.
या मेळाव्यात ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती, भविष्यातील दिशा आणि संघर्षाची पुढील रणनीती यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील आरक्षणाचा प्रश्न, न्यायालयीन घडामोडी तसेच सरकारची भूमिका यावर उपस्थित वक्ते आपली मते मांडणार आहेत.
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त केला जाणार असून, मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आज होणारा हा मेळावा ओबीसी समाजाच्या लढ्याला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, भोसरी परिसरात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


