शबनम न्यूज | प्रतिनिधी
पूर्णा नगर परिसरात प्रभाग क्रमांक ११ मधील इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष निशा दिनेश यादव यांनी नागरिक व मतदारांच्या घरोघरी गाठीभेटी घेत थेट संवाद साधला. या वेळी त्यांनी नागरिकांना आपले परिचयपत्र वितरित केले तसेच प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून परिसरातील प्रश्न समजून घेतले.
या संवादातून पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट्स, वाहतूक कोंडी, ड्रेनेज तसेच महिलांच्या सुरक्षिततेसारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. तरुणांनी रोजगार, कौशल्यविकास आणि खेळाच्या सुविधांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य सुविधा, औषधोपचार आणि सार्वजनिक सोयीसुविधांबाबत सूचना केल्या.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना देत, या विकासप्रक्रियेत स्थानिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे निशा यादव यांनी अधोरेखित केले. “शहर विकासाचा नवा अध्याय लिहिला जात असून, या कामात सर्वसामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आमदारांचे हात बळकट करून परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा आहे,” असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
भेटीदरम्यान परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने निशा यादव यांचे औक्षण करून स्वागत केले. महिलांमध्ये नेतृत्वाबाबत आत्मविश्वास वाढत असून, महिला संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण शिबिरे, स्वयंरोजगार उपक्रम आणि महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकारात्मक संवाद आणि चेहऱ्यावर दिसणारा विश्वास पाहून निशा यादव यांनी समाधान व्यक्त केले. या जनसंवादामुळे पूर्णा नगर परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, थेट जनसंपर्कातून प्रश्न समजून घेण्याची ही पद्धत प्रभावी व कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया यावेळी मतदारांनी व्यक्त केली.


