शबनम न्यूज | प्रतिनिधी
महिलांवरील अन्याय, अत्याचार, शोषण आणि प्रशासनातील दुर्लक्ष याविरोधात थेट लढा देण्यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटना येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे अधिकृत उमेदवार उभे करणार आहे, अशी ठाम घोषणा दुर्गा ब्रिगेडच्या नेत्या दुर्गा भोर यांनी केली आहे.
आज महिला केवळ योजनांची लाभार्थी न राहता निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे काळाची गरज आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महिलांशी संबंधित प्रश्न – सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्वावलंबन, कौटुंबिक हिंसाचार, तसेच कायदेशीर मदतीचा अभाव – हे गंभीर स्वरूपाचे आहेत. मात्र पालिकेतील सत्ताधारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दुर्गा भोर यांनी केला.
“महिला प्रश्नांवर फक्त भाषण नको, तर थेट निर्णय घेणारी आणि लढणारी महिला प्रतिनिधी पालिकेत हवी. दुर्गा ब्रिगेड संघटना महिलांना न्याय देण्यासाठी, त्यांचा आवाज पालिकेत बुलंद करण्यासाठी स्वतःचे अधिकृत उमेदवार उभे करणार आहे,” असे दुर्गा भोर यांनी स्पष्ट केले.
दुर्गा ब्रिगेडचे उमेदवार हे चारित्र्यसंपन्न, सामाजिक कार्यात सक्रिय, महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे आणि कोणत्याही दबावाला न झुकणारे असतील, असेही त्यांनी सांगितले. महिलांच्या हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई आता पालिकेच्या सभागृहात नेली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या माध्यमातून महिलांच्या न्यायासाठी लढण्याची तयारी असलेल्या इच्छुक उमेदवारांनी दुर्गा ब्रिगेड संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


