शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २८ मधून अनिताताई संदीप काटे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यांच्या प्रचाराला वेग येत असून, प्रचारार्थ त्यांचे पती संदीप काटे यांनी प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधला.
या संवादात्मक भेटींमध्ये पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, स्ट्रीट लाईट्स तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नागरिकांनी आपली मते मांडली. संदीप काटे यांनी प्रत्येक समस्या काळजीपूर्वक ऐकून घेत तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत सकारात्मक भूमिका मांडली.

नागरिकांनी यावेळी स्थानिक पातळीवर सातत्याने उपलब्ध राहणारे, संवाद साधणारे आणि काम करणारे नेतृत्व अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. “निवडणुकीपुरते नव्हे, तर कायम संपर्कात राहणारे प्रतिनिधी हवे आहेत,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. विशेषतः महिला मतदारांनी आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर ठोस कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली.
या गाठीभेटींमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनिताताई संदीप काटे यांच्या नेतृत्वाबाबत विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी काळात प्रभागातील विविध सोसायट्या, व्यापारी संघटना आणि युवक-युवतींसोबत स्वतंत्र संवाद बैठका घेण्याचे नियोजनही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



