शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या निवडणूक विभागामार्फत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत रिंग पद्धत सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. निवडणूक कामासाठी आवश्यक असलेल्या स्टेशनरी, प्रिंटिंग, बॅनर, नाश्ता, जेवण, पाणी तसेच मंडप पुरवठा यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून, त्यामधील अटी-शर्ती विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळावा या हेतूने तयार केल्याचा आरोप अरुण विठ्ठल जोगदंड (युवासेना उपजिल्हाप्रमुख, पुणे) यांनी केला आहे.
निविदांमध्ये ‘निवडणूक कामाचा अनुभव असणे आवश्यक’ अशी अट घालण्यात आली आहे. ही अट सर्वसामान्य व पात्र ठेकेदारांना अपात्र ठरवणारी असून स्पर्धा कमी करणारी असल्याचे मत मांडण्यात आले आहे. प्रत्यक्षात महापालिकेच्या इतर निविदांमध्ये संबंधित कामाच्या अंदाजित किमतीच्या सुमारे ३० टक्के कामाचा शासकीय अथवा अशासकीय अनुभव ग्राह्य धरला जातो. अशा अटींमुळे अधिक ठेकेदार सहभागी होतात, स्पर्धा वाढते आणि महापालिकेला वाजवी दर मिळून करदात्यांच्या पैशाची बचत होते, असेही सांगण्यात आले.
दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या निविदेमध्ये ‘शासकीय निवडणुकांसाठी स्टेशनरी साहित्य पुरवठ्याचा अनुभव’ मागितला असल्याने अनेक नियमित स्टेशनरी पुरवठादार, तसेच शासनाच्या स्टार्टअप धोरणांतर्गत नोंदणीकृत कंपन्या या प्रक्रियेतून बाहेर पडत आहेत. त्यामुळे सदर अट विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवूनच टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक कामाचा अनुभव असण्याची अट शिथिल करून अधिकाधिक ठेकेदारांना संधी देण्यात यावी, निविदा प्रक्रिया पारदर्शक व स्पर्धात्मक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी अरुण जोगदंड यांनी केली असून, त्यांनी निवडणूक विभागाने या विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे.


