spot_img
spot_img
spot_img

संजोग वाघेरे यांचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरातील प्रमुख नेते व शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आता भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश करण्याचा स्पष्ट निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजोग वाघेरे यांनी “मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे” असे स्पष्ट शब्दांत जाहीर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लवकरच त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा होणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून शहरात जोरदार रणनीती आखली जात होती. मात्र, ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी होती, त्या संजोग वाघेरे यांनी साथ सोडल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. याचा थेट फटका निवडणूक तयारीवर बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि संजोग वाघेरे यांच्यातील जवळचे संबंध सर्वश्रुत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार लांडगे तसेच भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासोबत संजोग वाघेरे यांच्या गुप्त बैठका सुरू होत्या. याच बैठकांमधून भाजप प्रवेशाची संपूर्ण पटकथा तयार झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

अखेर आज संजोग वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा करत सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!