शबनम न्यूज | प्रतिनिधी
बहुप्रतिक्षित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चिंचवड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. पिंपळे निलख, वाकड आणि कस्पटे वस्तीचा समावेश असलेल्या या प्रभागात यंदा भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक मैदानात उतरले आहेत.
या सर्व इच्छुकांमध्ये स्नेहा कलाटे यांचा प्रचार आणि वाढता जनसंपर्क विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. ‘रणजित आबा कलाटे फाउंडेशन’च्या माध्यमातून विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करत त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. कोणतेही राजकीय पद नसतानाही प्रभागातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी उपक्रम, तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर यामुळे स्नेहा कलाटे यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, इतर महिला इच्छुक उमेदवार उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा करत असताना, स्नेहा कलाटे यांनी घराघरात जाऊन प्रचार सुरू केला असून त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकही चक्रावले आहेत. त्यांच्या प्रचारपद्धतीमुळे प्रतिस्पर्धकांसाठी ही बाब डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.
आगामी उमेदवारी ठरवताना आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विद्यमान नगरसेवक, नव्याने इच्छुक असलेले चेहरे तसेच कलाटे कुटुंबातील प्रबळ दावेदार स्नेहा कलाटे यांच्यात कोणाला संधी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील काळात आमदार जगताप आणि शहराध्यक्ष काटे यांनी सर्व इच्छुकांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत, कोणाचीही उमेदवारी जाहीर न करता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची सावध भूमिका घेतली होती.
एकंदरीत, प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठीची ही रस्सीखेच आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, अंतिम निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.


