शबनम न्यूज:प्रतिनिधी
पिंपरी: पिंपळे निलख आणि विशाल नगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आम आदमी पार्टीने प्रशासनासमोर सातत्याने आणि ठामपणे मांडला होता. आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहर आणि शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षांपासून या भागात स्वतंत्र पोलीस चौकी उभारावी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. सुरुवातीला या संदर्भात मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना लेखी पत्रव्यवहार करून परिसरातील गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.
मात्र, वारंवार पत्रव्यवहार करूनही या मागणीची दखल घेतली जात नसल्याने, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी आणि शहराध्यक्ष रविराज काळे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला या प्रश्नाची गंभीरता लक्षात आली आणि पिंपळे निलख –विशाल नगर परिसरात पोलीस चौकी उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यानंतर महानगरपालिकेकडून पोलीस प्रशासनाला नवीन पोलीस चौकीचे भाडे ठरवण्यासंदर्भात पत्र आले आणि त्यानंतर अधिकृतरित्या पोलीस चौकी सुरू करण्यासाठी काम सुरू झाले.
आज सुमारे दीड वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर आणि पाठपुराव्यानंतर या लढ्याला अखेर यश मिळाले असून, पिंपळे निलख – विशाल नगर येथे पोलीस चौकी उभारणीच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. संबंधित विभागामार्फत आवश्यक प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच प्रत्यक्ष पोलीस चौकी कार्यान्वित होणार आहे.
या परिसरात वाढती लोकसंख्या, वाहतुकीची वाढती समस्या तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील तक्रारी लक्षात घेता पोलीस चौकीची अत्यंत गरज होती. पोलीस चौकी सुरू झाल्यानंतर परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होणार असून गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळेल आणि नागरिकांना तात्काळ पोलीस मदत मिळणे शक्य होणार आहे.
आम आदमी पार्टी आणि शहराध्यक्ष रविराज काळे हे नेहमीच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहिले आहेत. पिंपळे निलख – विशाल नगर येथील पोलीस चौकीचा निर्णय हा जनतेच्या सुरक्षिततेसाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असून, पुढेही परिसराची सुरक्षितता व सर्वांगीण विकासासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


