शबनम न्यूज : प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार,दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर झाले.या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
संजय सोनवणी (भारतातील वैचारिक बंडांचा इतिहास),सर्फराज अहमद (दख्खनचा मध्ययुगीन इतिहास आणि विपर्यास), लक्ष्मीकांत देशमुख आणि डॉ.कुमार सप्तर्षी या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ‘ गांधी दर्शन’ विषयावरचे हे १९ वे शिबीर होते.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, ऍड.स्वप्नील तोंडे,तेजस भालेराव ,एड.राजेश तोंडे,रमेश आढाव,अप्पा अनारसे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सर्फराज अहमद म्हणाले,’उत्तरेच्या विरोधात केंद्रीय सत्तेत असणाऱ्या विरुद्ध दखनी सत्तांनी म्हणजे मराठ्यांनी लढा दिला. हा धर्म संघर्ष नव्हता. मराठी संस्कृतीकारणाला धर्माचा रंग देता कामा नये . इतिहासातील सत्ताधीशांच्या एकाहून अनेक कबरी आहेत. त्यामुळे त्यांच्या पाडापाडीत जाण्यात अर्थ नाही. नावे बदलून कोणत्याही समाजाला राष्ट्रातून वगळता येणार नाही. तसे करून दुहीची बीजे पेरली जात आहेत’, असा आरोप सर्फराज अहमद यांनी केला.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,’ दखनी वारसा मन आणि बुद्धीने समजून घेतला पाहिजे. हा अतिशय महत्वाचा इतिहास आहे. मुस्लिमांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ देता कामा नये. पुरोगामी महाराष्ट्राने धर्मद्वेष्टे होऊ नये. नव्याने पुरावे शोधून सर्वसमावेशक संस्कृतीचे पुनर्लेखन केले पाहिजे.’
संजय सोनवणी म्हणाले,’विचारमृत होण्याकडे आपली वाटचाल झाली आहे. समाज निरर्थक विचार, वादात गुरफटलेला आहे. नवसृजनाची प्रक्रिया थांबलेली आहे. भारतात वैचारिक बंडांची कल्पना पुरातन आहे. वैचारिक सृजन नसेल तर त्या संस्कृतीला संस्कृतीच म्हणता येत नाही.आज नव्या कालानुरूप वैचारिक क्रांतीची गरज आहे.