spot_img
spot_img
spot_img

शिक्षण परिषदेतून शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शिस्त ही भीतीतून नाही तर विश्वासातून निर्माण झाली पाहिजे. सकारात्मक शिस्त हीच मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. या अनुषंगाने त्यांनी सकारात्मक शिस्त याविषयी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण परिषदेचे आयोजन होणार आहे.

राज्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेचे प्रकार समोर येत असून समाजात याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षित वातावरण आणि शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तालुके आणि केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर किमान 45 मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या मार्गदर्शन सत्रामध्ये विविध मुद्यांवर चर्चा केली जाणार असून त्यामध्ये शारीरिक शिक्षेबाबत शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदी व शिक्षकांची जबाबदारी, शिक्षेचे प्रकार व स्वरूप, शिक्षेचे परिणाम, शिक्षेचा मनावर व मेंदूवर होणारा परिणाम, विविध शैक्षणिक विचारवंत व त्यांचे सकारात्मक शिस्तीचे विचार, सकारात्मक शिस्त तत्त्वे व त्यांची अंमलबजावणी, संवाद सहकार्य व समुपदेशन यावर आधारित वर्ग व्यवस्थापन, योग्य शिस्तीचे मार्ग, सकारात्मक शिस्तीचे तंत्र व उपक्रम आदी मुद्यांचा समावेश असेल.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिका भाग दोन मधील ‘सकारात्मक शिस्त-एक आव्हान’ या लेखाचा आधार घेण्याचे सुचविण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!