दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा तसेच प्राविण्य मिळविणाऱ्या दिव्यांग बांधवांचा होणार सन्मान
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बुधवार (३ डिसेंबर) रोजी ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त समाज विकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी नवीन योजनांचे उद्घाटन व विविध उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच विशेष प्राविण्य प्राप्त दिव्यांग नागरिक व विद्यार्थी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी दिली.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे आणि दिव्यांग भवन फाउंडेशनच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्या अधिपत्याखाली जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज विकास विभागाच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमामध्ये दिव्यांग बांधवांसाठी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत यू.डी.आय.डी. कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड दुरुस्ती केंद्र सुरू राहणार आहे तर दुपारी १२ ते सायंकाळी ७ दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच विशेष प्राविण्य प्राप्त दिव्यांग नागरिक व विद्यार्थी यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन योजनांचे उद्घाटन देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यावेळी दिव्यांग बांधवांना दिव्यांग कल्याणकारी योजना, उद्योग उभारणी आदी विषयांवर मार्गदर्शन देखील करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
समाज विकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या सर्व सुविधा व संधी उपलब्ध करून देणे व समावेशक समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे.
— ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका








