spot_img
spot_img
spot_img

विद्यार्थ्यांसोबत भिंती रंगवण्याचा हा क्षण खरोखरच खास – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत रंगकाम करण्याचा अनुभव म्हणजे जणू पुन्हा शाळेच्या दिवसांत परत गेल्यासारखे वाटले. मुलांचा उत्साह, त्यांची निरागस कल्पनाशक्ती पाहताना माझ्याही शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. इतक्या मनापासून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत भिंती रंगवण्याचा हा क्षण खरोखरच खास आणि स्मरणीय ठरला असे मत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा प्रशिक्षण व अध्ययन संस्था (DIET) यांच्या संयुक्त विद्यमाने भवानीपेठ येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भित्तीचित्र सादरीकरण झाले. या भित्तीचित्र पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर बोलत होत्या.

यावेळी शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर क्षीरसागर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक अरुण जाधव, तसेच जिल्हा प्रशिक्षण आणि अध्ययन संस्थेचे प्राचार्य नामदेव शेंडकर, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा प्रशिक्षण व अध्ययन संस्था (DIET), भवानीपेठ येथे ‘निपुण भारत’ या विषयावर विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशिक्षण व अध्ययन संस्थेच्या भिंतीवर चित्र रेखाटले . फिट इंडिया – हिट इंडिया, निपुण भारत, साक्षर भारत – सक्षम भारत अशा विविध राष्ट्रीय संकल्पनांवर आधारित १८ विद्यार्थ्यांच्या एकूण १८ कलाकृती संस्थेच्या भिंतींवर रेखाटण्यात आल्या. महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी आणि कला शिक्षकांनी मिळून ही संपूर्ण भित्तीचित्रे साकारली असून कार्यालयीन परिसर अधिक प्रेरणादायी आणि शैक्षणिक बनला आहे.

या उपक्रमासोबतच महापालिकेच्या शाळांमधील कला शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये उच्च दर्जाचे कला शिक्षण राबवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मानधन कला शिक्षकांना आधुनिक कला तंत्र, भित्तीचित्र रचना, रंगांचा वापर आणि सर्जनशील अध्यापन पद्धती याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

शहरी शाळांमध्ये कला-विकासाला चालना मिळावी, विद्यार्थ्यांची सृजनशीलता वाढावी त्यांच्या कलागुंणाना वाव मिळावा हा या संपूर्ण कार्यक्रमाचा प्रमुख हेतू होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा हा उपक्रम भविष्यातील शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या कलात्मक क्षमतेत मोठी भर घालणारा ठरणार आहे.

निपुण भारतासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला नवी दिशा मिळते. कला ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वाची कडी आहे. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी साकारलेली ही भित्तिचित्रे त्यांच्या कल्पकता उदाहरण आहे.
– तृप्ती सांडभोर अतिरिक्त आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!