शबनम न्यूज | प्रतिनिधी
सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना भोसरीतील लांडेवाडी परिसरात सोमवारी (दि. २४) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडला.
आकाश अनसरवाडे (वय २३) असे जखमी तरुणाचे नाव असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. राहुल क्षिरसागर उर्फ संभ्या (वय ३२), सचिन सहादू गाडेकर (वय ३८, रा. लांडेवाडी, भोसरी), केतन सावंत ऊर्फ पिद्या (वय ३२) आणि त्यांचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. नागेश दत्ता अनसरवाडे (वय २८, रा. स्वप्नपुर्ती हाऊसिंग सोसायटी, मोशी) यांनी मंगळवारी (दि. २५) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ आकाश अनसरवाडे हा आपल्या भोसरीतील लांडेवाडी कमानीजवळ असलेल्या टपरीवर बसलेला होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी सिगारेट घेतली आणि पैसे न देता निघू लागले. आकाशने पैसे मागितल्यावर आरोपींनी शिवीगाळ करत मी कोण आहे तुला माहिती आहे का, त्यानंतर आणखी शिवीगाळ करीत आता तुला सोडणार नाही, असे म्हणत लाकडी दांडक्याने हल्ला केला.
त्यानंतर आरोपी केतन सावंत याने सिमेंटचा गट्टू उचलून आकाशच्या चेहऱ्यावर फेकला. यात त्याचा जबडा आणि नाक फॅक्चर झाले आरोपी सचिन गाडेकर आणि अनोळखी तरुणाने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या आकाशवर सध्या खासगी रुग्णालायातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सचिन गाडेकर याला अटक केली आहे. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.








