spot_img
spot_img
spot_img

माणसाच्या जीवनात अन्नाइतकेच वाचन महत्त्वाचे! – जगन्नाथ नेरकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी
 ‘संवेदना प्रगल्भ होण्यासाठी माणसाच्या जीवनात अन्नाइतकेच वाचन महत्त्वाचे असते!’ असे विचार संत तुकारामनगर येथील सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका या संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृह, नवी पेठ, पुणे येथे व्यक्त केले. साने गुरुजी संस्कार साधना संस्था, पुणे या संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गरुड यांच्या हस्ते शां. बा. जोशी ग्रंथप्रेमी पुरस्कार प्रदान करून जगन्नाथ नेरकर यांना गौरविण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप गरुड यांनी, ‘सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वाचन चळवळ वृद्धिंगत करीत असतानाच स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाचे मौलिक कार्य करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून यशस्वी झालेले अनेक विद्यार्थी विविध आस्थापनांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सानेगुरुजींना अपेक्षित असलेली धडपडणारी मुले या यशस्वी अधिकाऱ्यांच्या रूपात समाजात वावरत आहेत!’ असे गौरवोद्गार काढले.
जगन्नाथ नेरकर पुढे म्हणाले की, ‘विज्ञानाच्या दृष्टिकोनातून माणूस हादेखील एक प्राणी आहे असे मानले जाते; परंतु इतर प्राण्यांपेक्षा तल्लख बुद्धीचे वरदान मानवाला मिळाले आहे. वाचनामुळे माणसाचा सारासार विवेक जागृत होऊन तो समाजासाठी विधायक कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो. सानेगुरुजींचे नाव धारण करणाऱ्या संस्थेकडून झालेला हा गौरव भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी स्फूर्ती देत राहील!’ अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. अलका पुराणिक यांनी प्रास्ताविक केले. ॲड. संतोष मस्के यांनी सूत्रसंचालन केले .

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!