शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर मंगळवारअखेर दोन हजार ३५२ हरकती आल्या आहेत.महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली. या याद्या सदोष असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. शहरामध्ये ९२ हजार दुबार मतदार असल्याचे महापालिकेने घोषित केले आहे. आतापर्यंत दोन हजार ३५२ हरकती महापालिका निवडणूक विभागास मिळाल्या आहेत. मतदार यादी कक्षाकडे ३७ हरकती दाखल झाल्या आहेत.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वांधिक ९७४ हरकती दाखल झाल्या आहेत. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाकडे ५२६, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाकडे ३२४, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाकडे २०६ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाकडे १५०, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाकडे ८५, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडे ३३ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वांत कमी १७ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. हरकती दाखल करण्यासाठी उद्या गुरुवारपर्यंत मुदत आहे.








