शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रारूप मतदार यादीबाबत सूचना,हरकत,आक्षेप नोंदवण्यासाठी २१ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी सहाय्यक आयुक्त तथा उप निवडणूक अधिकारी सचिन पवार यांना दिली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीतामा. निवडणूक आयोगाकडील प्राप्त झालेल्या मतदार याद्या फोडुन महानगरपालिका निवडणूकीसाठी ३२ प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करुन त्या दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर प्रारूप मतदार यादीवर सूचना, हरकत, आक्षेप नोंदवण्यासाठी दि.२७ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी देण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये शनिवार व रविवार हे साप्ताहिक सुट्टीचे दोन दिवस आलेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एकूण ३२ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये सुमारे ५५ हजार ते ६५ हजार मतदारांची संख्या आहे. अनेक प्रभागांमध्ये दुबार तिबार मतदारांची संख्या आहे. मृत व्यक्तींची नावे आहेत. तसेच काही मतदारांची नावे मूळ प्रभाग सोडून शेजारच्या प्रभागांमध्ये किंवा इतरत्र समाविष्ट झाली आहेत. तर काही ठिकाणी मूळ प्रभागात इतर प्रभागातील मतदारांचा समावेश झाला आहे. या विषयाच्या बाबत मतदारांमध्ये जनजागृती अत्यंत अल्प झाल्यामुळे अनेक मतदार याबाबत अनभिज्ञ आहेत. इतर प्रभागात समाविष्ट झालेल्या नावांबाबत आयोगाने नमुना अ व नमुना ब नुसार भरावयाचा फॉर्म व त्यासोबत जोडावयाचे पुरावे यासाठी वेळ लागत आहे.
त्यामुळे या याद्या तपासून स्थलांतरित मतदार शोधणे, त्यावर सूचना, हरकत, आक्षेप नोंदवण्यासाठी आपण दिलेला केवळ ५ दिवसाचा कालावधी पुरेसा नाही. त्यामुळे २७ नोव्हेंबर पासून आणखी किमान २१ दिवसाचा कालावधी वाढवून मिळावा. यासाठी आपण आमच्या या मागणीबाबत महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्याकडे आमची मागणी पाठवून तिला मान्यता घेऊन कालावधी वाढून घ्यावा, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.








