शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना पदाधिकारी व पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर विनयकुमार चौबे यांची दि. २४ नोंव्हेबर २०२५ रोजी पोलिस आयुक्त कार्यालय चिंचवड येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष- संदीप बेलसरे, उपाध्यक्ष- विनोद नाणेकर, संचालक- संजय सातव, स्वीकृत संचालक – संजय भोसले, तसेच पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे व पोलिस आयुक्त कार्यालयातील डेप्युटी पोलिस कमिशनर उपस्थित होते. या वेळेस संघटनेने विविध समस्यांचे निवेदन पोलिस आयुक्तांना दिले.
१. औद्योगिक परिसरात वाढलेल्या चोऱ्यांबाबत :-
पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील तळवडे, सोनवणेवस्ती,, शांतीनगर, प्राधिकरण सेक्टर ७ व १० तसेच एम.आय.डी.सी. भोसरी, पिंपरी, चिंचवड या औद्योगिक परिसरात चोऱ्याचे प्रमाणात वाढ झालेली असून चोरटे गटागटाने येऊन सुरक्षा रक्षकाला प्राणघातक हत्याराचा धाक दाखवून चोरी करतात, सुरक्षा रक्षक निशस्त्र असल्यामुळे प्रतिकार करू शकत नाही. पोलीस उद्योजकांनाच सी.सी.टी.व्ही. बसवा, सुरक्षारक्षक ठेवा असा सल्ला देतात. वरील औद्योगिक परिसरातील बहुतांश उद्योजकांनी आपापल्या कंपनीमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविलेले असून सुरक्षारक्षक देखील ठेवलेले आहेत, परंतु ज्या कंपन्यांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत त्या कंपन्यांनी संबधित पोलीस स्टेशनला सी.सी.टी.व्ही .फुटेज देऊन देखील अद्याप पर्यंत चोरांचा किंवा चोरी झालेल्या मालाचा पोलिसांना तपास लागलेला नाही.
2. अट्टल गुन्हेगार चोरांवर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करणेबाबत : –
पोलीस दप्तरी औद्योगिक परिसरात चोऱ्या करणाऱ्या ज्या अट्टल गुन्हेगाराची नोंद आहे, त्यांच्यावर कायमस्वरूपी कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली पाहिजे. औद्योगिक परिसरात महिला कामगार वर्ग देखील कामाला आहे. या चोरांकडून महिला वर्गाची छेड-छाड केली जाते. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्याची चोरी केली जाते. या चोरट्यामुळे महिला कामगारांना ओव्हर टाईमला थांबवू शकत नाही व महिला देखील ज्यादा वेळ कामावर थांबत नाही. तसेच पुरुष कामगारांना अडवून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल काढून घेतले जातात, त्यांना मारहाण केली जाते. त्यामुळे कामगारांच्या कामावर येण्याच्या व घरी जाण्याच्या वेळेत पोलीस पथकांनी गस्त घालण्याची व्यवस्था केली पाहिजे.
3. अनाधिकृत माथाडी कामगार संघटना बाबत : –
लघुउद्योग हे माथाडी कामगार कायद्याच्या कक्षेत येत नसतांनाही औद्योगिक परिसरात स्वयंघोषित अनाधिकृत माथाडी कामगार संघटना या त्यांचे कामगार कामावर ठेवा व प्रोटेक्शन मनी देण्यासाठी उद्योजकांना नाहक त्रास देत असतात. या सर्व प्रकारामुळे येथील उद्योग बंद अथवा स्थलांतरित करण्याच्या मनस्थितीत या परिसरातील उद्योजक आले आहेत. कंपनीमध्ये चोरी व इतर त्रास होईल या भीतीने उद्योजक तक्रार करण्यास पुढे येत नाही.
४. अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानाबाबत.
वरील सर्व औद्योगिक परिसरातील चोरीला गेलेले भंगार हे त्या परिसरातील अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानातच विकले जाते. या अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानाचा शोध घेउन त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर होणाऱ्या चोऱ्यांना थोड्याफार प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल.
५. औद्योगिक परीसरातील वाहतूक कोंडीबाबत.
पिंपरी चिंचवड तसेच चाकण औद्योगिक परिसरात सकाळी व संध्याकाळी प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस हजर नसल्याकारणाने मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी सकाळी कंपन्या चालू होण्याच्या वेळेस व संध्याकाळी कंपन्या सुटण्याच्या वेळेस होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य ते पोलीस बळ उपलब्ध करून देऊन औद्योगिक परिसरातील प्रत्येक चौकात सकाळी व संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे.
६. कायमस्वरूपी पोलीस गस्ती पथकाबाबत : –
सन २०१३ मध्ये पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने प्रायोगिक तत्वावर गस्ती पथक योजना राबवली होती. त्यावेळेस चोऱ्यांचे प्रमाण देखील कमी झाले होते. परंतु आर्थिक कारणांमुळे सदर योजना बंद करावी लागली. तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योजकांना अशी योजना राबविणे शक्य होणार नसल्याकारणाने हीच योजना पोलीस स्टेशन मार्फत राबवावी.
पोलिस विभागाला पुरेशे मनुष्यबळ व वाहने दिलेली आहेत स्थानिक पोलिस विभाग व संघटना एक संयुक्त बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करावी.
वरील विषयावर बोलताना पोलिस आयुक्त यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात सध्या १८०० जणावर कारवाई करून त्यापैकी ८५३ सराईत गुन्हेगारावर मोका लावून त्यांना तडीपारीचा आदेश देण्यात आला आहे.
आपल्या कंपनीत व गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कोणी अनाधिकृत माथाडी कामगार किंवा एखादा चोरटा आल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे त्याला पकडून त्याच्यावर कारवाई करणे सोपे जाईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्रोटेक्शन देऊन औद्योगिक परिसरातील अनाधिकृत भंगार दुकाने कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी सहकार्य केले जाईल.
औद्योगिक परिसरात सकाळी व संध्याकाळी जी वाहतूक कोंडी होते त्यावर बोलताना आयुक्त म्हणाले की, सदर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी उद्योजकांच्या सहकार्याने जादा वाहतूक सहाय्यक नेमणूक करून सदर ठिकाणची वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच कंपनी कामगार सुटण्याच्या वेळेत बदल करण्याचे सहकार्य करण्यास कंपनी व्यवस्थापनाला सुचविले जाईल.
रात्रीच्या वेळेस व दिपावलीच्या काळात गस्तीपथकाकडून गस्त घालण्यासाठी उद्योजकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलिस कर्मचारी व उद्योजकांचे काही कामगार किंवा सुरक्षा रक्षक यांच्या मदतीने औद्योगिक परिसरात होणाऱ्या चोरीवर नियंत्रण करता येईल.
दर तीन महिन्याने औद्योगिक परिसरातील उद्योजकांची आढावा बैठक घेऊन झालेले कामाची माहिती दिली जाईल.
उद्योजकांच्या पुढील बैठकीत माथाडी कामगार संघटना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पी. एम. आर. डी. ए., व एम. आय. डी . सी. संबंधित अधिकारी यांचे बरोबर एक संयुक्त बैठक घेतली जाईल असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.








