शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे शहरातील औंध मध्ये सिंध सोसायटी परिसरात रविवारी पहाटे कथितपणे दिसलेल्या बिबट्याचा शोध अजूनही सुरू आहे. रविवारी पहाटे चार च्या सुमारास सोसायटीच्या आवारात एक बिबट्या फिरतानाची चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यामुळे वन विभागाचे अधिकारी, रेस्क्यू संस्थेचे बचाव पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले. या पथकाची शोध मोहीम अजूनही सुरूच आहे. मात्र या शोधमोहीमेत ‘एआय’ चा अडथळा निर्माण होत आहे. काही नागरिक एआय द्वारा बनावट छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करून अफवा पसरवत आहेत. त्यामुळे बिबट्याची छायाचित्रे सत्य आहेत की एआय द्वारा निर्माण केले गेलेले खोटे बनावट छायाचित्र आहे. याचे शोध देखील घेण्यात येत आहे. शहरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशाप्रकारे खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती छायाचित्रे किंवा संदेश पसरवू नयेत, अन्यथा त्यांच्यावर विद्यमान शासकीय नियमावली व कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशारा वन विभागाने दिला आहे.
सध्या औंध मध्ये वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी विविध संशयित भागात थर्मल ड्रोन च्या मदतीने तसेच पायी आणि वहनाद्वारे गस्त घालून शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र, अद्याप तरी कोणत्याही कॅमेरात संबंधित बिबट्या दिसून आलेला नाही किंवा त्याच्या पायाचे ठसे आढळून आलेले नाही. रविवारी पहाटे चार नंतर बिबट्या कोणत्याही प्रत्यक्षदर्शी किंवा पुराव्यासहित दिसलेला नाही, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. त्याच प्रमाणात बिबट्याचा शोध सुरू असून नागरिकांनी सतर्क राहावे, परंतु अनावश्यक भीती बाळगू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.








