शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. अनेक प्रभागांत ५ हजार पेक्षा जास्त मतदारांचा घोळ झाला असून अनेक मतदारांचे नाव हे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेले, तसेच मतदार यादीत दुबार मतदार वाढ झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रकार परिषदेत शहर समन्वयक विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, पक्ष प्रवक्ते अजित गव्हाणे, मंगलाताई कदम, भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, फजल शेख, उल्हास शेट्टी, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, श्रीधर वाल्हेकर, विनायक रणसुभे आधी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या प्रमुख मागण्या –
१.मतदाराला आपले नाव ऑनलाईन / ॲपवर त्याच्या नाव, पत्ता किंवा मतदान ओळखपत्र क्रमांकावरून त्वरित शोधता येईल, अशी युजर-फ्रेंडली सर्च सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी.
२.वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या PDF मतदार याद्यांमध्ये ‘सर्च’ (Search) करण्याची सुविधा त्वरित अंतर्भूत करावी, जेणेकरून मतदारांना मॅन्युअल शोधण्याची गैरसोय टाळता येईल.
३.मोठ्या प्रमाणात झालेल्या चुकीच्या विभाजनावर, विशेषतः पूर्ण यादी भाग किंवा वस्ती चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या ठिकाणी, स्थळ पाहणी करून suo-moto (स्वतःहून) दुरुस्ती करण्याची कार्यवाही प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत तातडीने सुरू करावी.
४.प्रभाग स्तरावर मतदारांना त्यांचे नाव व प्रभाग शोधण्यासाठी विशेष सहायता केंद्रे (Help Centers) त्वरित उपलब्ध करून द्यावीत.
५.प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करताना आयोगाच्या आदेशातील परिच्छेद २ नुसार, केवळ सेक्शन अॅड्रेस नव्हे, तर प्रत्यक्ष भौगोलिक स्थान तपासून केलेल्या दुरुस्त्या अंतिम यादीत समाविष्ट केल्याची खात्री करावी.
६.प्रारूप मतदारयाद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात घोळ झाले असल्याने सदर प्रारूप याद्यांबाबत हरकती सूचना दाखल करण्यासाठी देण्यात आलेली मुदत ही वाढविण्यात यावी.
७.प्रारूप मतदारयाद्यांबाबत हरकती / सूचना दाखल करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात यावी.
८. दुबार / तिबार मतदारांबाबत आपल्या मार्फत देण्यात आलेल्या आदेशाचे काटेकोरपणे व तातडीने पालन करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्ताप्न करून त्याबाबतच्या कार्यवाही बद्दलचे स्थिती सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध करून द्यावी.
९.मतदारयाद्यांमधील त्रुटी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या मार्फत लाक्षात आणून दिल्या त्याबाबतची सखोल चौकशी करून दुरुस्ती करण्याची मुभा महानगरपालिका आयुक्तांना द्यावी जेणेकरून सामान्य मतदारांना होणारा मनस्ताप टाळता येईल.








