शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरी स्थानिक संस्था (युएलबी) यांची कार्यक्षमता वाढविणे, संस्थात्मक शिक्षणाला चालना देणे आणि अत्याधुनिक प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनिक अनुभव समृद्ध करण्याच्या उद्देशाने नुकतेच पिंपरी चिंचवड महापालिकेला कोयंबतूर महापालिकेच्या प्रतिनिधींनी भेट दिली. या भेटीद्वारे अधिकाऱ्यांनी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन आणि स्वच्छता व्यवस्थापनातील ‘ऑपरेशन अँड मेंटेनन्स’ कामकाजाचे व्यापक निरीक्षण केले.
कोयंबतूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अनामिका रमेश (भा.प्र.से.), मुख्य अभियंता थिरू विजयकुमार यांच्यासह सदर अभ्यासदौऱ्यात कोयंबतूर महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अत्याधुनिक वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या स्थळावर पाहणी करण्यात आली. या प्रकल्पात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, संकलन ते विल्हेवाट प्रक्रियेतील यंत्रणा, तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले तसेच वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प सल्लागार प्रतिनिधी स्वरूप लागारे यांनी सदर प्रकल्पाबाबत कोयंबतूर महापालिकेच्या प्रतिनिधींना माहिती दिली.
वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाचे केलेले व्यवस्थापन, स्वच्छता आणि तांत्रिक अंमलबजावणी पाहून विशेषतः कोयंबतूर महापालिकेच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. प्रकल्पातील प्रत्येक प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध व व्यवस्थितपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. उपस्थित अधिकाऱ्यांनी दिलेले सविस्तर मार्गदर्शन, तांत्रिक माहितीची स्पष्ट मांडणी आणि संपूर्ण प्रकल्पाबाबत दाखवलेली पारदर्शकता यांचेही त्यांनी कौतुक केले. या भेटीमुळे महापालिकेच्या कार्यक्षमता, समन्वय आणि प्रगत शहरी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट अनुभव मिळाल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. पाहणीदरम्यान प्रशासकीय आणि तांत्रिक अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. तसेच दोन्ही महापालिकांदरम्यान भविष्यातील सहकार्याच्या नव्या मार्गांना यामुळे चालना मिळाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणारे कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उपक्रम आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प हे शाश्वत शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत. कोयंबतूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली समाधानकारक प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. अशा देवाणघेवाणीमुळे तांत्रिक प्रगतीला गती मिळते आणि उत्तम प्रशासनासाठी नव्या संधी निर्माण होतात.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील कचरा व्यवस्थापनाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून हाताळत आहे. वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पामुळे शहरातील कचरा विल्हेवाटीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना मिळत आहे. आजच्या पाहणीमुळे आमच्या कामाची दिशा इतर महापालिकांसाठी आदर्श ठरत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका








