शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे शहरात आणि परिसरात थंडीचा कडाका वाढलेला असताना आता हवामान बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान पुण्यासह मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
निरभ्र आकाश, कोरडे वातावरण उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत आहे. त्यामुळे शहरात गुलाबी थंडीत वाढ झाली आहे. प्रामुख्याने दिवसाच्या तुलनेत रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटल्याचेही चित्र दिसून आले. आता मात्र हवामानात काही काळासाठी बदल होण्याची चिन्हे आहेत.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुधवारपासून तापमानात वाढ होऊ शकते. दक्षिण, मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होऊन 22 ते 24 डिसेंबर दरम्यान सांगली ,कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.








