spot_img
spot_img
spot_img

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी – राज्यपाल आचार्य देवव्रत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे.  हे सर्व रोखण्यासाठी नैसर्गिक शेतीलाच प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व प्रबुद्ध समाजाने आपल्या स्तरावर नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.

‘संकल्प फाउंडेशन’ या प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांसाठी ‘नैसर्गिक कृषी : अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर राजभवन मुंबई येथे आयोजित चर्चासत्रामध्ये संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.

मोठ्या प्रमाणात होत असलेली रासायनिक खतांची आवक थांबवली पाहिजे या खतांमुळे गहू व तांदूळ यातील पोषणमूल्य कमी झाले आहे. भावी पिढ्यांची अन्नधान्य व जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक व जैविक शेतीमध्ये मोठा फरक आहे असे सांगून रासायनिक तसेच जैविक शेती पेक्षा नैसर्गिक शेती मानव तसेच सूक्ष्म जीव कल्याणाची आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

 

धर्म, अर्थ व काम यांच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीसाठी निरामय आरोग्य आवश्यक आहे व आरोग्यासाठी दिनचर्या, भोजन यांसह पर्यावरण महत्त्वाचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले. आज जागतिक तापमानवाढीचे जगापुढे मोठे संकट आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर पडत आहे. त्यामुळे सर्वांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी व नैसर्गिक उत्पादने खरेदी करावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुमार तनेजा यांनी आपल्या प्रास्ताविकात संकल्प फाउंडेशनने आजवर हजारो प्रशासकीय अधिकारी घडवले असून ते भारतीय सांस्कृतिक विचार पुढे नेत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे मुंबई येथील संघचालक सुरेश भगेरिया, संकल्पचे महासचिव संतोष पाठक, सचिव राजू चौहान तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!