spot_img
spot_img
spot_img

पीएमपीएमएल बसला लागलेली आग अग्निशमन विभागाच्या पथकाने त्वरित आणली नियंत्रणात

 

पिंपरी, दि. १६ नोव्हेंबर २०२५ : पिंपरीतून भोसरीकडे निघालेल्या पीएमपीएमएलच्या बसला आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास पिंपरी चौकाजवळील कामगार भवनासमोर पिएमपिएमएल बसला अचानक आग लागली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील पथकाने घटनास्थळी त्वरित धाव घेत ही आग नियंत्रणात आणली आहे. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व १५ प्रवासी सुरक्षित बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आज सकाळी पीएमपीएमएलची बस पिंपरीतून भोसरीच्या दिशेने निघाली. या बसने महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा थांबा घेतल्यानंतर ती नेहरूनगरच्या दिशेने रवाना झाली. लोखंडे कामगार भवनासमोर आल्यावर बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत बसचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर प्रवाशांना धोक्याची सूचना देत सर्वांना खाली उतरवले. या बसमध्ये चालक, वाहक यांच्यासह १५ प्रवासी होते.

अग्निशमन विभागाला बसने पेट घेतल्याची माहिती मिळताच मुख्यालयातून त्वरित अग्निशमन विभागाचे पथक रवाना करण्यात आले. पथकाने घटनास्थळी पोहोचताच प्रथम सुरक्षेच्या दृष्टीने परिसर रिकामा करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग बसच्या इंजिन भागात पसरल्यामुळे काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले होते. तथापि प्रशिक्षित जवानांनी या आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझवली.

या घटनेच्या वेळी परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरीत्या मार्ग मोकळा केला व परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनास्थळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली. तर पथकामध्ये अग्निशमन विभागाचे उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, लीडिंग फायरमन शहाजी कोपनर, यंत्रचालक मयूर कुंभार, जवान अतुल मोरे, प्रकाश गव्हाने, पूजा वालगुडे, ओंकार गंगाड, हर्षल पवार, महेश गरड, सरिता जामणेकर आणि वैभव सोनवणे यांचा समावेश होता.

दरम्यान, वाहनांमध्ये धूर किंवा अनैसर्गिक आवाज जाणवल्यास त्वरित वाहन थांबवून सुरक्षा पाळावी तसेच अशा प्रसंगी तात्काळ १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

अग्निशमन विभागाच्या जवानांनी दाखवलेली तत्परता, आणि जलद प्रतिसादामुळे आग पसरू शकली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. आमच्या संपूर्ण पथकाने केलेली कामगिरी प्रशंसनीय आहे.

– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

आग लागल्याच्या घटनांमध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. तात्काळ संदेश मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले व परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य असून योग्य प्रशिक्षण व उपकरणांच्या मदतीने मोठी दुर्घटना टळली.
— संदीप खोत, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

 

आग लागल्याची वर्दी मिळताच आमचे अग्निशामक पथक तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. सर्वप्रथम बसमध्ये कोणीही अडकलेले नाही, याची खात्री करण्यात आली. कारण नागरिकांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बसच्या इंजिन परिसरात ऑईल असल्याने त्या भागातील ज्वाळांची तीव्रता जास्त असल्यामुळे तथा CNG गॅस ने पेट घेतला असता तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. पथकातील सर्वांनी समन्वयाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करत काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळवले.

-ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!