spot_img
spot_img
spot_img

जिल्हा परिषद पुणे आयोजित दोन दिवसीय बालसाहित्य महोत्सव उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी
जिल्हा परिषद, पुणे आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय बालसाहित्य महोत्सव – २०२५ हा १३ व १४ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्य संमेलन घेण्यात आल्याने हा उपक्रम ऐतिहासिक ठरला. महोत्सवाची सुरुवात ३० शाळांमधील ६०० विद्यार्थ्यांच्या भव्य ग्रंथ-दिंडीने झाली. ज्ञानेश्वरीतील विविध व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांच्या लेझीम, ढोल-ताशा आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण रंगून गेले.
उद्घाटन समारंभाचे शुभारंभ विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि संस्था अध्यक्ष राजन लाहे मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या दिवशी “विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सकारात्मक वाचनपर्यावरण” या परिसंवादात चारुहास पंडित व सौ. संगीता बर्बे यांनी मार्गदर्शन केले. तर ३० बाललेखकांचा पद्मश्री श्रीमती माधुरी पुरंदरे यांच्याशी प्रेरणादायी संवाद झाला. बालकवी संमेलनात १५ बालकवींनी स्वतः रचलेल्या कविता सादर केल्या.
दुसऱ्या दिवशी कथा-कथन व वक्तृत्व सत्रात १५ विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. रवी मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने ‘टोटोचन’ नाट्यप्रयोग सादर झाला. अतिरिक्त पोलीस महासंचालक  विश्वास नांगरे पाटील यांच्याशी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी संवाद पार पडला.
“लेखक आपल्या भेटीला” सत्रात बालभारतीचे लेखक  एकनाथ आव्हाड, विलास सिंदगीकर, सौ. सुनंदा भावसार आणि सौ. मृणालिनी कानिटकर यांनी कथानिर्मिती, चित्रांकन आणि लेखनप्रक्रियेवरील नवमार्गदर्शन दिले. यंदा प्रथमच आयोजित शिक्षक साहित्य संमेलनात शिक्षकांनी कविता,कथा-कथन आणि एकपात्री नाट्यप्रयोगातून आपली कला सादर केली.
समारोप सत्रात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एन. एम. जोशी, श्री. लक्ष्मीकांत देशमुख आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. संतोष राऊत उपस्थित होते. ८ गटांतील २४ विद्यार्थी व २ गटांतील ६ शिक्षकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला सृजनशील व समावेशक शिक्षणपरिसर देण्याची बांधिलकी व्यक्त केली.
दोन दिवसीय हा बालसाहित्य महोत्सव विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, कला, साहित्य, व्यक्तिमत्वविकास आणि प्रेरणेचा उत्सव ठरला. बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात जिल्हा परिषद शाळांमधील १,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी साकारलेल्या साहित्यकृतींचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
लीडरशिप फॉर इक्विटी (LFE), रूम टू रीड, ओपन लिंक फाउंडेशन (OLF), फॉरेन लँग्वेज ऑनलाइन अॅप्लिकेशन (FLOA), थिंकशार्प फाऊंडेशन आणि प्रथम बुक्स या संस्थांनी साक्षरता उपक्रमांच्या चौकटीत जिल्हा परिषद शाळांमधील विविध यशोगाथा प्रदर्शित केल्या.
मेहता पब्लिशिंग हाऊस, ज्योत्स्ना प्रकाशन, साधना प्रकाशन, बालभारती प्रकाशन, न्यानगंगा प्रकाशन आणि ज्ञानप्रबोधिनी प्रकाशन या नामांकित प्रकाशन संस्थांनीही या महोत्सवात सहभाग घेतला व मुलांच्या साहित्याचा समृद्ध आणि विस्तृत संग्रह सादर केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!