शबनम न्यूज | प्रतिनिधी
जिल्ह्यातील एकूण १७ नगरपालिकांच्या ३९८ सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी आज सोमवारपासून (दि. १०) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या असून, पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी दि.१ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी ६ लाख ३४ हजार ९४० मतदार आहेत. या १४ नगरपरिषदांपैकी बारामती ही अ वर्ग नगरपरिषद आहे, तर लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे व फुरसुंगी – उरळी देवाची या पाच नगरपरिषदा ब वर्गामध्ये आहेत, तर क वर्गामध्ये सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर यांचा समावेश होतो. मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक यांचा समावेश नगरपंचायतींमध्ये होतो.
एक वर्षांपूर्वी नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषदेसह मंचर आणि माळेगाव या नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. फुरसुंगी- उरळी देवाची नगरपालिकेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून, एकूण प्रभाग संख्या ही १६ असणार आहे, तर ३२ नगरसेवकांची संख्या असणार आहे. या निवडणुकीतून नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी थेट निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे.








