spot_img
spot_img
spot_img

विद्यार्थ्यांनो, अपयशाला यशाची शिडी बनवा ; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आवाहन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विद्यार्थी हा आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. त्यांना पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीतील सर्वांगिण दृष्टीकोन विकसित करणारे, समाजाप्रती संवेदनशील बनविणारे, मानसिक व शारीरिक आरोग्य अबाधित राखत कायम सकारात्मक दृष्टीकोन देणारे, पुस्तकाबाहेरील शिक्षण द्यायला हवे. कारण, विद्येचे अंतिम उद्दिष्ट केवळ पदवी मिळवणे नव्हे; मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणे, स्वतःला देशाच्या प्रगतीसाठी समर्पित करणे — हेच खऱ्या शिक्षणाचे यश आहे.

अपयश हे शेवट नसते, तर नव्या प्रवासाची सुरुवात असते. त्यामुळे, अपयशाला यशाची शिडी बनवून तुमच्या ज्ञान, कर्तृत्व आणि संवेदनशीलतेच्या बळावर भारताला जागतिक महासत्ता बनवा, असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

ते येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या ८व्या दीक्षांत समारंभप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडीचे संचालक प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, भारत सरकारच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष, उष्मायन व उद्यमशीलता क्षेत्रातील राष्ट्रीय तज्ज्ञ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष श्री. रामानन रामनाथन, ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित ‘गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीज’चे चेअरमन श्री. सुभाष त्यागी, एसएसपीएल ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक तथा राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेच्या (नारेडको) राष्ट्रीय अध्यक्षा स्मिता पाटील, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, सौ. ज्योती ढाकणे-कराड, डॉ. विनायक घैसास, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. लक्ष्मीधर बेहरा यावेळी म्हणाले की, भारतीय परंपरेत आनंद स्वतःत शोधला जातो. भगवद्गीता आपल्याला समाधानी राहायला शिकवते, असे सांगताना त्यांनी अनुभवाधारित शिक्षणाद्वारेच भारत आत्मनिर्भर होऊ शकतो, असे मत व्यक्त केले.

रामानन रामनाथन यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने निर्माण केलेले जागतिक स्थान आणि भविष्यातील संशोधनाची गरज यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित केले. स्मिता पाटील यांनी राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेच्या कार्याची माहिती देताना एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला आणि पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

काच उत्पादनात प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता – सुभाष त्यागी
मी विद्यार्थी दशेत अभ्यासात हुशार नव्हतो, मात्र माझ्यात मेहनत करण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. त्याच इच्छाशक्तीच्या बळावर आज गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीजची वार्षिक उलाढाल १० हजार कोटींपेक्षा अधिक झाली असून ४ हजारांहून अधिक लोकांना रोजगार देऊ शकलो. भारतात सध्या दररोज १ लाख टन काचेची गरज भासते, मात्र उत्पादन फक्त २० हजार टन आहे. त्यामुळे काच उत्पादन क्षेत्रात संशोधन आणि रोजगार निर्मितीसाठी प्रचंड वाव आहे, असे मत ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ सुभाष त्यागी यांनी व्यक्त केले. त्यांनी आज मिळालेल्या डी.लिट पदवीमुळे आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचेही सांगितले.

“एमआयटी एडीटी विद्यापीठाने कायमच विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण पुरवित कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःला विविध आघाड्यांवर सिद्ध केले आहे. त्याचमुळे विद्यापीठाने नॅक मानांकन, एनआयआरएफ आणि क्यूएस रँकिंगमध्ये ठसा उमटवत जागतिक पातळीवर नाव कमावले आहे. संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठ आता आपल्या ‘२.०’ मोहिमेवर असून, त्यातून देशात अव्वल स्थान मिळवत भारताला आत्मनिर्भर करणारे विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करणार आहे. आज पदवी मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात नेतृत्व करत भारताला आत्मनिर्भर बनवावे.”

— प्रा. डॉ. मंगेश तु. कराड,
कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे

मान्यवरांसह डॉ. मंगेश कराडांचा सन्मान
एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून रामानन रामनाथन यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (D.Sc.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. तसेच ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित  सुभाष त्यागी यांना औद्योगिक नेतृत्वाबद्दल ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (D.Litt.) या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. यासह, डॉ. मंगेश कराड यांना माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ‘उत्कृष्टतेचे शिल्पकार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
राष्ट्रगीत आणि विश्वशांती प्रार्थनेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमात २१ पीएचडी, २१ सुवर्णपदके आणि १९५ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी पालक आणि विद्यार्थ्यांसह देशभरातून ८ हजारांहून अधिक लोकांनी हजेरी लावली. यावेळी राजदंडासह काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘पसायदान’ने सांगता झालेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर, प्रा. स्वप्निल शिरसाठ आणि डॉ. अशोक घुगे यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!