शबनम न्यूज | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार संचालक असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीच्या एका जमीन व्यवहाराबाबत माध्यमांमध्ये विविध बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या प्रकरणाबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत निवेदन जारी करून संपूर्ण माहिती स्पष्ट केली.
अजित पवार म्हणाले की, “या व्यवहारासंदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांशी तसेच पार्थशी सविस्तर चर्चा करून सर्व तथ्ये जाणून घेतली आहेत. या व्यवहारात ना मी, ना माझे कार्यालय कोणत्याही टप्प्यावर सहभागी झालेले नाही. कोणताही फोन, मदत किंवा हस्तक्षेप झालेला नाही.”
ते पुढे म्हणाले, “उपलब्ध माहितीनुसार हा फक्त जमीन खरेदीचा प्राथमिक करार आहे. पार्थ, त्याची कंपनी ‘अमेडिया’ किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून विक्रेत्यास कोणतेही पैसे देण्यात आलेले नाहीत, तसेच जमिनीचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे हा व्यवहार अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे.”
पार्थच्या म्हणण्यानुसार, व्यवहार पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शकतेने पार पाडण्यात आला होता. मात्र, सार्वजनिक जीवनात संशयाची किनारही राहू नये म्हणून पार्थने स्वतःहून तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला असून संबंधित विक्रीपत्र रद्द करण्याचे दस्तऐवज नोंदणी कार्यालयात सादर केले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली असून “कोणाकडे काही ठोस माहिती किंवा पुरावे असल्यास त्यांनी समितीसमोर सादर करावेत,” असे आवाहनही पवार यांनी केले.
अजित पवार म्हणाले, “मी आजवर नेहमीच कायदा आणि नियमांच्या चौकटीत राहून काम केले आहे. माझे प्रत्येक निर्णय हे न्याय, सत्य आणि वैधतेच्या मूल्यांवर आधारित आहेत. हीच मूल्ये माझ्या कुटुंबीयांनाही लागू आहेत.”
शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच त्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नेहमीच प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या सर्वोच्च नैतिक निकषांचे पालन करत आले आहेत.”








