शबनम न्यूज | प्रतिनिधी
दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे अडीच लाखांचा गांजा जप्त केला. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने निगडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या केली असून बुधवारी (दि.५) गुन्हा दाखल करण्यात आला.
पहिली कारवाई मंगळवारी (दि.४) रात्री यमुनानगर, निगडी येथे करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल संतोष सपकाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओटास्कीम निगडी येथे राहणाऱ्या दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या ताब्यातून दोन लाख ३० हजार ४५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
दुसरी कारवाई बुधवारी (दि.५) ताथवडे येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किसन बबन जाधव (वय ५७, रा. ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्याकडून पोलिसांनी ११ हजार ७५० रुपये किमतीचा २२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.








