शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी १८०४ कोटींची महार वतनाची ४० एकर जमीन अवघ्या ३०० कोटींमध्ये खरेदी केल्याचे प्रकरण समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. यामध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीला म्हणजेच अमेडिया होल्डिंग एलएलपीला तब्बल २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांकडून आरोप सुरू आहे. त्यामुळे पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उपनिबंधक यांना निलंबित करण्यात आले आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. मात्र, आपण व्यवहार केलाच नाही, अशी प्रतिक्रिया निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली.
निलंबनानंतर सूर्यकांत येवले म्हणाले की, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कारण मी हा व्यवहार केलेला नाही. आमच्याकडून कोणतीही परवानगी दिली गेली नाही, महार वतनाची जमीन होती आणि दुय्यम निबंधकासोबत व्यवहार झाला आहे, त्यामुळे काय व्यवहार झाला? त्याबद्दल मला माहिती नाही. तसेच निलंबनाचा मला अजून आदेश मिळालेला नाही. जमीन व्यवहाराची माझ्याकडे फाईल आलीच नाही, आमच्याकडून परवानगी दिली नाही, असा पुनरुच्चार येवले यांनी केला.
पुढे ते म्हणाले, जो व्यवहार झालाय आणि दस्त झालाय तो सब रजिस्टर संदर्भातील आहे. माझ्याकडून परवानगी दिली नाही आणि मी प्रस्तावित केलं नाही. माझ्यावर केलेल्या कारवाईचे पत्र अजून मिळाले नाही, त्यामुळे मला काही बोलता येणार नाही. आदेश प्राप्त झाले नाही, म्हणून बळीचा बकरा बनवलं का? हेही मला सांगता येणार नाही. कारण आदेश प्राप्त झाल्याशिवाय मी बोलू शकत नाही. माझ्याकडे कोणीही माहिती मागवली नाही, काल तर सुट्टी होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्याकडे माहिती मागवली नाही. मी अजून दस्तच पाहिला नाही, त्यामुळे व्यवहार गैर आहे, असे मी म्हणू शकत नाही. कारण माझ्याकडे ते कागदच आले नाही तसेच माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा दावा सूर्यकांत येवले यांनी केला आहे.








