भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कलाकार कट्टा ला कलाकारांचा प्रचंड प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिनानिमित्त भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून ‘कलाकार कट्टा’ या उपक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. या माध्यमातून शहरातील कलाकारांसाठी आपली कला सादर करण्याकरिता एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोई यांच्यावतीने पं. पद्माकर कुलकर्णी कला मंदिर, तळमजला, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे नवकलाकारांकरिता , आपल्यातली कला आत्मसात करून ती या व्यासपीठावर सादर करण्याकरिता हा कलाकार कट्टा उपलब्ध आहे. या व्यासपीठाचे उद्घाटन दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी भाऊसाहेब भोईर, साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, मा. जोशी सर, मा ढवळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये कलाकार, साहित्यिक ,पत्रकार, नाट्य, संगीत, लोककलावंत तसेच नृत्य कलावंत, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, “रंगभूमी दिनाचे औचित्य साधत शहरातील कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या कलाकार कट्टा उपक्रमाचे शुभारंभ करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहर मध्ये विकासासोबतच कला आणि संस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी हे यशस्वी पाऊल असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले. तसेच या उपक्रमात सहभागी होऊन, आपल्यातली कला आत्मसात करून या व्यासपीठावर सादर करण्याचे आवाहन देखील भाऊसाहेब भोईर यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापली विविध कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच दर महिन्याला या कलाकार कट्टा या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आश्वासन दिले. सोबतच आपापली कला जोपासण्याकरिता व्यासपीठामार्फत सादर करणार असल्याचे देखील अनेक कलाकारांनी सांगितले तसेच हा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी भाऊसाहेब भोईर यांचे आभार व्यक्त केले.








