पिंपरी : शहरातील विविध भागातून विस्कळीत पाण्याच्या तक्रारी येत आहेत. धरणातून पाणी मुबलक मिळत आहे. परंतु, महापालिकेला पाणी वितरणाचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत आहे. टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्या, टँकर माफियांना पोसण्यासाठी कृत्रिम पाणी टंचाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. शहरातील पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण, अतिक्रमण अशा विविध कामाचा आढावा घेतला. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, तृप्ती सांडभोर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, उपायुक्त सचिन पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार बारणे यांनी पत्रकार परिषद घेतली.
खासदार बारणे म्हणाले, थेरगाव, दापोडी, काळेवाडी, किवळे, वाल्हेकरवाडीसह शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विस्कळीत, अपुरा, अवेळी पाणीपुरवठयाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तक्रारी निकाली काढाव्यात. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू देऊ नका, नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे. रावेत बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित झाले आहे. शिवणे बंधा-यातून पाणी उचलण्याबाबत चाचपणी करावी.
मुळा नदी सुधार प्रकल्प राबविताना झाडे तोडू नका, डिझाइनमध्ये सुधारणा करून ८०० झाडे वाचविली आहेत. आणखी काही सुधारणा करून झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा. झाडांचे पुनर्रोपण करावे. थेरगाव पूल ते पिंपळे सौदागर दरम्यान पवना नदीतील पात्रावर गवत उगवले आहे. गाळ साचला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. ते पात्र स्वच्छ करून घ्यावे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासोबत एकत्र बैठक घ्यावी. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमनावर तत्काळ कारवाई करावी. जागेचे भूसंपादन करून रस्ता विकसित करावा. वाल्हेकरवाडीपासून रावेत जाणारा रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करावे.
थेरगाव, डांगे चौक, चिंचवड, काळेवाडी, निगडी, वाल्हेकरवाडी येथे खासगी प्रवासी बस रस्त्यावर थांबतात. त्यामुळे वाहतूक चौकांमध्ये कोंडी होते. लोकांना मोठा त्रास होत आहे. त्यावर तोडगा काढावा. बस थांबण्यासाठी जागा द्यावी. ट्रॅव्हल बस चालक आडमुठ्यापनाने वागत असतील. तर, दंडात्मक कारवाई करावी. वाहतूक पोलिसांना पत्र देऊन रस्त्यावर थांबणा-या बसवर कारवाई करण्याची मागणी करावी. महापालिका रुग्णालये, दवाखान्यात दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत. त्याची जनजागृती करावी. सर्व रुग्णालयात डायलिसीसची सुविधा सुरु करावी. तालेरा रुग्णालयातील बर्न वॉर्डच्या कामाला गती द्यावी. ते काम पूर्ण करून वॉर्ड सुरू करावा. डायलिसीस मशिन, ओपन जिमसाठी साहित्य सीएसआरमधून उपलब्ध करुन देतो असे खासदार बारणे यांनी सांगितले. ४० टक्के ग्रामीण भागातील रुग महापालिका रुग्णालयात उपचार घेत आहेत. सेवा म्हणून सर्वांना वैद्यकीय उपचार करावेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा भार पडू देऊ नका, शहरातील करदात्यांना उपचार मिळाले पाहिजेत.
जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे. तलाव काही महिने बंद आहेत. आकुर्डीतील जलतरण तलाव बंद आहे. खोली जास्त असल्याने हा तलाव बंद आहे. खोली कमी करावी. सांगवी जलतरण तलाव येथील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. पाइप खराब झाले आहेत, त्याची दुरुस्ती करावी. उन्हाळ्यात विनाअडथळा तलाव सुरू ठेवावेत. रेडझोन हद्दीचा नकाशा तत्काळ प्रसिद्ध करावा. त्यामुळे नागरिकांचा हद्दीबाबतचा संभ्रम दूर होईल, असेही बारणे म्हणाले.
पीएमआरडीए हद्दीतील कामांना गती
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा अर्थसंकल्प, मावळ लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा खासदार बारणे यांनी बैठकीत आढावा घेतला. आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळमधील कोथुर्णे, काळे कॉलनी, दारुंब्रे-लोहार वस्ती-साळूंब्रे ते चांदखेड हा रस्ता, सांगवडे ते नेरे, सांगवडे ते संत तुकाराम साखर कारखाना दरम्यानचा रस्ता, ब्राम्होणली या रस्त्यांची कामे पूर्णात्वाकडे आली आहेत. शिल्लक कामे तत्काळ पूर्ण करावीत. रस्ता नागरिकांसाठी खुला करावा. देहू, येलवाडी या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे. लोणावळा येथील टायगर, लायन्स पाॅंइंट येथील स्काय वॉकच्या कामाला गती द्यावी. आई एकविरा देवी मंदिर परिसरात प्रशस्त वाहनतळ विकसित करावे. डोंगरावरील हेलीपॅड, वेहरगाव पासून जाणारा पालखी मार्गाचा रस्त्याचा कामाला वेग द्यावा. तिकोणा, तुंग, राजमाची, लोहगड या चार किल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यातून किल्यांकडे जाणारे रस्ते, पाणी, स्वच्छतागृहाची कामे पूर्ण करावीत. पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.
एमएसआरडीच्या माध्यमातून जुना राष्ट्रीय महामार्ग (चार) हा राज्य सरकारला देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे. या महामार्गावरील कान्हे, कार्ला फाटा, वडगाव, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, सेंट्रल देहूरोड येथील वाहतूक कोंडी सोडवावी. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएसआरडीए आणि पीएमआरडीएची संयुक्त बैठक घ्यावी. त्यानुसार येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात. सोमटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे. वाकड, भूमकर चौकाकडून मारुंजीकडे जाणा-या रस्त्यावीरल लक्ष्मी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी मारुंजी गाव ते आल्हाट कॉलेज रस्ता विकसित करावा. पीएमआरडीएची वेबसाईट बंद आहे. ती तत्काळ सुरु करावी. लाभधारकांना ६.२५ टक्के मोबादला दिला जात आहे. १०६ लाभधारक आहेत. ७ लाभधारकांना लाभ दिला आहे. ५३ प्रकरणे निकाली काढली आहेत. उर्वरित तत्काळ निकाली काढावीत.
पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती द्या
पवना, इंद्रायणी नदी सुधारचे काम हाती घ्यावे. लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी, देहू, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करावेत. इंद्रायणीनदी लगत असलेल्या ३८ आणि पवना नदी काठच्या १८ गावात एसटीपी उभारले जाणार आहेत. इंद्रायणीसाठी ६७१ कोटी तर पवनासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याची कार्यवाही पीएमआरडीएने सुरु करावी. नदी स्वच्छतेसाठी तत्काळ पाऊले उचलावीत. याबाबत मी देखील पाठपुरावा करत असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.