शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेने नव्याने मान्य केलेल्या सहा एसटीपीच्या १८६० कोटीच्या टेंडर प्रक्रियेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध करत सदर टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. तसेच ही टेंडर प्रक्रिया रद्द न केल्यास येत्या सोमवारी पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील प्रशांत जगताप यांनी दिला.
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये मान्य केलेल्या सहा एसटीपी प्लांटचा प्रकल्प हा पुणेकरांसाठी धक्कादायक आहे, या सहा ही निवेदांची एकत्रित किंमत ही १८६० आहे, ज्या कंपनीला हे काम दिले त्या कंपनीला डोळ्यासमोर ठेवून ही निविदा प्रक्रिया करण्यात आली असल्याचा आरोप यावेळी प्रशांत जगताप यांनी केला.
दिलेल्या निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे की, दुर्दैवाने राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची लूट होत आहे आणि या ठिकाणी आयुक्त म्हणून आपण या संदर्भमध्ये कुठलीच दुरुस्ती करत नाही,हे समस्त पुणेकरांचे दुर्दैव आहे. आपण कालच्या स्थायी समितीमध्ये मान्य केलेला ६ एसटीपी प्लांटचा प्रकल्प हा पुणेकरांसाठी धक्कादायक आहे. या ६ ही निविदांची एकत्रित किंमत ही १८६० रु आहे. ज्या कंपनीला हे काम दिले आहे त्या कंपनीला डोळ्यासमोर ठेवून हि निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे असा आमचा आरोप आहॆ, ती संशयास्पद होतीच परंतु ज्या पद्धतीने नव्याने अटी मान्य करण्यात आल्या त्याच्यातून साधारणता पुणे महानगरपालिकेवर अर्थात पुणेकरांच्या कररुपी पैशांवर तब्बल ५०० कोटींचा दरोडा आहे हे सकृतदर्शनी दिसून येत आहे. पुणे महानगरपालिकेकडे असणाऱ्या हजारो कोटीच्या ठेवी, राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून पुणे महानगरपालिकेला हे एसटीपी प्लांट तयार करणे,त्याचबरोबर पुढे चालवणे शक्य झालं असतं पण केंद्रातील भाजपच्या आणि राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून या संदर्भामध्ये त्यांच्या मनाप्रमाणे टेंडर प्रक्रिया करायला लावली आणि आपल्या प्रशासनाने यासंदर्भामध्ये इमाने ईदबारे त्यांचा आदेश शिरसावंद्य मानला. त्याच्यामुळे निश्चित पुणे महानगरपालिकेला शेकडो कोटींचा फटका याच्यातून बसत आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्या कंपनीला हे टेंडर देण्यात आले आहे त्या कंपनीचे संचालक हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत पदाधिकारी आहेत आणि मग ज्या पुणेकरांनी भाजपला भरभरून मत दिली त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यासाठी अशाप्रकारे सगळी उठा ठेव करून पुणेकरांच्या कररुपी पैशांवर तब्बल ५०० कोटींचा दरोडा घालणे कितपत योग्य आहे, याचा आपण विचार करून ही टेंडर प्रक्रिया रद्द करावी,ही समस्त पुणेकरांच्या वतीने विनंती आहे. आपण ही टेंडर प्रक्रिया रद्द न केल्यास येत्या सोमवारी आम्ही पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणार आहोत. त्याचबरोबर मा. उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी सुद्धा दाद मागणार आहोत, आपल्याकडून भ्रमनिरास होणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.








