spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या ब्लॉक आणि बॅरिकेडिंगच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरील जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगतच्या अहिल्याबाई होळकर चौकातील मुख्य रस्त्यावर सिमेंटचे ब्लॉक टाकून बॅरिकेडिंग केल्याने नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आधीच वाहतूक कोंडी आणि गर्दीने ग्रस्त असलेला हा मार्ग, महापालिकेच्या नव्या प्रयोगामुळे आणखी अरुंद झाला आहे.

याबाबत माजी नगरसेवक शैलेश मोरे यांनी शनिवारी (दि.1) या ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत “ताबडतोब हे ब्लॉक काढून टाकावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा दिला.

मोरे म्हणाले, “हा प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे. अर्बन स्ट्रीट आणि चौक सुशोभीकरणाच्या नावाखाली यापूर्वीच हा मार्ग अरुंद करण्यात आला आहे. आता ‘जंक्शन इम्प्रुव्हमेंट’च्या नावाखाली सिमेंट ब्लॉक टाकून पुन्हा अरुंदीकरण करण्यात येत आहे. गरज नसताना हा प्रयोग सुरू करण्यात आला असून, नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना अडथळा निर्माण होत आहे.”

ते पुढे म्हणाले, “बीआरटी, मेट्रो, रिक्षा स्टँड, बस थांबे यांच्यामुळे आधीच या परिसरातील वाहतूक विस्कळीत आहे. तरीदेखील महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतला. मेट्रोसाठी असणारा रिक्षा थांबा सुमारे १०० मीटरवर हलवावा, जेणेकरून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत राहील. महापालिकेचे अधिकारी आज आहेत, उद्या नसतील; पण आम्ही स्थानिक आहोत. आमच्या भागात अराजकता निर्माण होऊ देणार नाही.”

याबाबत मतदारसंघातील चारही आमदारांना भेटून आपली भूमिका मांडणार आहे. जर प्रशासनाने तात्काळ निर्णय मागे घेतला नाही, तर आम्ही नागरिकांसह रस्त्यावर बसून आंदोलन करू. यामुळे पिंपरी परिसरातील व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, वाहतूक कोंडीमुळे दररोज नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीच्या सुरळीततेसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने या ब्लॉकविषयी पुनर्विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, असे शैलेश मोरे म्हणाले आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!