शरद पवार आणि दोन्ही ठाकरे बंधूंची पुरावे देत आक्रमक भाषणं !
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच महाविकास आघाडीचे शरद पवार, ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहिले. तसेच याप्रसंगी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही पुरावे देत आक्रमक भाषणं केली. या सत्याचा मोर्चात अनेक जिल्ह्यातून येऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदविला.

यावेळी शरद पवार म्हणाले, काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केली. बनावट आधारकार्ड तयार करुन मिळतात अशा त्या तक्रारी होत्या. कलेक्टर म्हणाले सिद्ध करा, पुरावे दिले गेले. मात्र ज्यांनी आरोप केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला समर्थन देतं आहे. आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत.पण देशाची संसदीय लोकशाही ही टिकवायची असेल, मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आणि मला एक व्हावं लागेल. आज व्यासपीठावर असलेले नेते याच भावनेतून एकत्र आले आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे सभेत म्हणाले की, मी आणि राज दोघंही भाऊ एकत्र आलो आहोत. पण आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत. मराठी माणसांसाठी. हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत. आम्ही पुढे जात असताना तुम्ही साथ दिली पाहिजे. साथ देण्याची धमक असेल तर हाताची मूठ वळवून दाखवा. हा फोटो मतचोराच्या बादशाहकडे पाठवा. मतचोरी केली तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाविरोधात आम्ही मोठं पाऊल उचलणार आहोत. चोर दिसेल त्याला तिथेच फटकवा. लोकशाही मार्गाने फटकवा. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. अॅनाकोंडा बसला आहे. मी मागेही आवाहन केल होतं. निवडणूक जशी जवळ येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबत आहोत.येत्या काही दिवसात आपण न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयाकडून न्याय मिळतो की नाही पाहू. आम्हाला आता न्याय पाहिजे. सर्व पुरावे दिल्यानंतर. त्या न्यायालयात न्याय मिळेल याची खात्री आहे. नाही तर जनतेचं न्यायालय निर्णय घ्यायला तयार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी यावेळी विरोधकांसोबतच सत्ताधारी आमदारही दुबार मतदारांची तक्रार करत असतील, तर मग तपास करण्यासाठी अडवलं कुणी? असा सवाल उपस्थित केला. “आम्ही बोलतोय, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार बोलतायत की याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्षही बोलतोय, कम्युनिस्ट पक्षाचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत.एवढंच नाही, भाजपाचेही लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेंचे, अजित पवारांचेही लोक बोलतायत. अरे मग अडवलं कुणी? मग हे निवडणूक घेण्याची घाई का करत आहेत? साधी गोष्ट आहे. मतदारयाद्या साफ करा. त्यानंतर जेव्हा निवडणुका होती, त्यात यश-अपयश सगळ्या गोष्टी मान्य असतील. सगळं लपवून-छपवून चाललंय, ते कशासाठी?” असा सवाल राज ठाकरेंनी केला.
“कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीतले ४५०० मतदार आहेत. या मतदारांनी तिथेही मतदान केलं आणि मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघातही मतदान केलं आहे. महाराष्ट्रभर असे लाखो लोक आहेत जे या मतदानासाठी वापरले गेले”, असा दावा करत राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत, याची एक यादीच वाचून दाखवली.








