spot_img
spot_img
spot_img

महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी येत्या ११ नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या प्रारूप आरक्षण सोडतीवर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यानंतरच कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार? याचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. १६५ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ८३ नगरसेविका आणि ८२ नगरसेवक असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी (एससी) २२ तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा आरक्षित आहेत. तसेच ओबीसीसाठी ४४ जागा राखीव आहेत.

या आरक्षण सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार आधी एसटी, एससी त्यानंतर ओबीसीचे आरक्षण काढले जाणार आहे, तसेच एक आरक्षण असलेल्या ठिकाणी चक्राकार पद्धतीने ते आरक्षण असणार आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाते. या सोडतीतूनच कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार असणार, हे ठरणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे ११ नोव्हेंबरच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.

आरक्षित जागांची संख्या निश्चित राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करणे- ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर

आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करणे – ८ नोव्हेंबर

आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे. – ११ नोव्हेंबर

प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक – २४ नोव्हेंबर

प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचनांवर विचार करुन निर्णय घेणे. – २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर

आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे – २ डिसेंबर

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!