शबनम न्यूज | प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलाला चार जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास खेड तालुक्यातील शेलु येथील पडवळ वस्ती परिसरात घडली.
शुभम गोडसे (रा. वासुली फाटा, ता. खेड, जि. पुणे), शुभम गाडे, शुभम शिवले आणि विशाल शेळके (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अल्पवयीन मुलाने शनिवारी (दि. २५) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मावसभाऊ दीपक व वैभव लिंभोरे यांच्या आयशर गाडीच्या भाड्याच्या कारणावरून शुभम गोडसे याच्याशी वाद झाला होता. त्यावेळी आरोपी गोडसे याने वैभव यास शिवीगाळ केली. दरम्यान, फिर्यादी हे भांडण सोडविण्यास गेले असता शुभम गाडे याने फिर्यादीच्या कपाळावर लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर शुभम शिवले याने फिर्यादीला उचलून आपटले. शुभम गोडसे आणि विशाल शेळके यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.








