शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी स्थगिती देण्यात आली होती. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यावर आयोगाने याची दखल घेत सुधारित जाहीरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १८ ऑगस्टला परीक्षा घेण्यात आली. समाज कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातून केदार गरड पहिला तर वैभव भुतेकर दुसरा आला आहे.
‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. ‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ या पदासाठी परीक्षा होणार होती.मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत ही परीक्षा स्थगित केली.
‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ४१, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २२, गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील १८ अशा विविध पदांसाठी जाहिरात दिली होती.राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते. दोन दिवसापूर्वी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पदाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यातील शेकडो उमेदवारांना यश आले आहे.








