शबनम न्यूज | प्रतिनिधी
गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई हिंजवडी येथील बेंद्रेवस्ती परिसरात टाटा मोटर्सजवळ शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहमद जब्बार सय्यद (वय ४०, रा. बाबुराव वाकडकर यांची खोली, अक्षरा इंटरनॅशनल स्कूलजवळ, वाकड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट दोनमधील पोलिस अंमलदार रवी प्रकाश पवार (वय ४०) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी येथील बेंद्रेवस्ती परिसरात टाटा मोटर्सजवळ सय्यद अमली पदार्थ विकत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता सय्यदला पकडले. त्याच्याकडून अधिक माहिती घेतली असता, तो वाकडकर यांच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणीही तपासणी केली. त्याच्याकडून ७५८ ग्रॅम वजनाचा, ३७हजार ९०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.








