शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात भिसे कुटुंबाने आरोप केला होता की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी उपचारांआधी १० लाख रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यासाठी अडवणूक केली होती. त्यामुळे डॉ. घैसास यांच्यावर टीका होत आहे. यामुळे डॉ. घैसास चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या चौकशीला कंटाळून घैसास यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. आमदार अमित गोरखे यांच्यासह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रुग्णालय प्रशासनाची बदनामी, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय आणि चौकशीला कंटाळून डॉ. घैसास यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. केळकर हे काही वेळात पत्रकार परिषद घेऊन घडलेली घटना व घैसास यांच्या राजीनाम्याबद्दल बोलतील.
अमित गोरखे म्हणाले, “भिसे कुटुंबाचं सुरुवातीपासून म्हणणं होतं की या दुर्दैवी मृत्यूला डॉ. घैसास जबाबदार आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चांगलं काम करत आहे आणि पुढेही करेल. राज्य सरकारने व मंगेशकर कुटुंबाने ज्या उदात्त हेतूने हे रुग्णालय चालू केलं होतं. त्या हेतूला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम डॉ. घैसास यांच्या कृतीने केला आहे. त्यामुळे आमची मागणी होती की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचाच अर्थ तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कुठेतरी घैसास यांना अपराधीपणा वाटत होता. त्याच अपराथी भावेतून त्यानी राजीनामा दिला असावा. आपण कुठेतरी चुकलोय ही भावना त्यांच्या मनात आली असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा.”